वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या हंगामातील येथे सुरु असलेल्या 11 व्या प्रो-कबड्डी लिग स्पर्धेतील शेवटपर्यंत रंगलेला पाटणा पायरेट्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना अखेर अनिर्णित (टाय) राहिला. या दोन्ही संघांनी निर्धारीत वेळेनंतर 40-40 असे समान गुण नोंदविले.
या चुरशीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सच्या तुलनेत गुजरात जायंट्स संघाने आपल्या आक्रमक आणि अचूक चढायामुळे वर्चस्व राखले होते. पाटणा पायरेट्स संघातील देवांकने सुपर 10 गुण तर एम. सुधाकरने 7 गुण नोंदविले. गुजरात जायंट्सतर्फे गुमानसिंग आणि जितेंद्र यादव यांनी प्रत्येकी 8 गुण तर राकेशने 9 गुण नोंदविले. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर गुजरात जायंट्सने पाटणा पायरेट्सचे काही गडी बाद करुन 3 गुणांची आघाडी मिळवली. पहिल्या 5 मिनिटांच्या कालावधीनंतर गुजरात जायंट्सने पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद केले. त्यामुळे दोन्ही संघात 6 गुणांचा फरक राहिला. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत गुजरात जायंट्सने पाटणा पायरेट्सवर 6 गुणांची आघाडी राखली होती. मध्यंतरावेळी सामन्याची स्थिती 22-18 अशी होती. सामन्याच्या उत्तरार्धात गुजरात जायंट्सचे सर्व गडी बाद झाल्याने पाटणा पायरेट्सने गुणांचा फरक भरुन काढला. आणि या दोन्ही संघात केवळ 2 गुणाचा फरक राहिला. पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सवर एका गुणाची आघाडी मिळवली होती. सामना संपण्यास 9 मिनिटे बाकी असताना हे दोन्ही संघ बरोबरीत होते. सामन्याअखेरीस गुणांची कोंडी कायम राहिल्याने ही लढत 40-40 अशी बरोबरीत राहिली.









