माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचे स्पष्टीकरण : कंपन्यांना आर्थिक योगदान दिल्याने संचालकपदी झाली होती
प्रतिनिधी/ बेंगळूर
पीएफ फसवणुकीच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा यांनी स्पष्ट केले. पीएफ निधीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविऊद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते. याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही. यात माझी थेट भूमिका नाही. जनतेची फसवणूक मी का करू, असे म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकृत सोशल नेटवर्क ‘एक्स’वर याबद्दल त्यांनी पोस्ट केली आहे.
पीएफ पैशांच्या फसवणुकीच्या आरोपाचा सामना करत असलेल्या कंपनीमधील त्यांची भूमिका स्पष्ट केली. माझ्यावर पीएफ प्रकरणाचे आरोप ऐकले जात असल्याने मला स्पष्टीकरण द्यायचे आहे, असे म्हणत त्यांनी पत्राला सुऊवात केली. स्ट्रॉबेरी लेन्नेरिया प्रा. लि., सेंटॉरस लाईफस्टाइल ब्रँड्स प्रा. लि., बेरीज पॅशन हाऊस कंपनीमध्ये मी 2018-19 मध्ये संचालक म्हणून काम केले. हे केवळ या संस्थांसोबत कर्जाच्या स्वरुपात त्यांच्या आर्थिक योगदानावर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले.
2018-19 मध्ये, मी या कंपन्यांना कर्जाच्या स्वरुपात निधीचे योगदान दिले म्हणून माझी संचालक म्हणून नियुक्ती झाली. पण मी या कंपनीत सक्रिय एक्झक्मियुटिव्ह म्हणून काम केलेले नाही किंवा कंपनीच्या कारभारात मी सहभागी नाही. क्रिकेटपटू म्हणून मी टीव्ही प्रेझेंटर म्हणून काम करत होतो. त्यामुळे त्या कंपनीच्या व्यवसायात भाग घेण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. मी ज्या कंपनीला कर्ज दिले आहे त्यात मी कोणतीही कार्यकारी भूमिका बजावलेली नाही, असेही रॉबिन उथप्पा यांनी स्पष्ट केले.









