उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कृत्य : पीडित कुटुंबाला 1 कोटी देण्याची मागणी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील निवासस्थानाबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण अभिनेत्याच्या घरात बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न करत होते. या आरोपींनी पुष्पा-2 च्या प्रीमियरदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या परिवाराला 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अभिनेत्याने यापूर्वी मृत रेवतीच्या परिवाराला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादमध्ये 4 डिसेंबर रोजी पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, थिएटर आणि सुरक्षा एजेन्सी विरोधात गुन्हा नोंदविला होता. अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. अल्लूला यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
अल्लू अर्जुनने बेजबाबदारपणा दाखविला, महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावरही तो थिएटरमधून बाहेर पडला नाही आणि रोड शो केला होता. जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, राज्यात कुठलाही बेनिफिट शो किंवा चित्रपटाच्या तिकिटांचे दर वाढविण्यास अनुमती दिली जाणार नाही असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी केला आहे. तर एआयएमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनने महिलेच्या मृत्यूबद्दल कळल्यावर चित्रपट आता हिट होणार असल्याचे असे उद्गार काढल्याचा आरोप केला आहे.
प्रतिमा मलीन करण्याचा कट
पुष्पा-2 च्या प्रीमियरवेळी हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी मला जबाबदार ठरविले जात आहे. काही लोक जाणूनबुजून माझी प्रतिमा मलीन करू पाहत आहेत. मी 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत असून जो सन्मान आणि विश्वसनीयता मी कमाविली होती, त्याला एका दिवसात धक्का पोहोचविण्यात आला. यामुळे मला अपमानित झाल्याचे वाटत आहे. तर चेंगराचेंगरीत जखमी झालेला मुलगा हळूहळू बरा होत असल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत म्हटले आहे.









