योगशास्त्राच्या अनेक प्रकरांमध्ये हठयोग हा प्रसिद्ध आहे. हठयोग याचा अर्थ सर्वसामान्यांना जमणार नाही अशा अवघड कृती करणे किंवा स्वत:च्या शरीराला स्वत:हून अशा हालचाली करावयास लावणे, की ज्या सामान्य माणसांना करता येणार नाहीत. लवकरच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे. त्या महाकुंभमेळ्यात भारताच्या विविध भागांमधून अनेक हठयोगी समाविष्ट होणार आहे. सध्या मध्यप्रदेशातील ‘अमला धाम आश्रम’ येथील राधे बाबा या हठयोगी महाराजांची चर्चा या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
हे हठयोगी महाराज त्यांची तपस्या आणि योगसाधना यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही साधना आपण विश्वशांती आणि सर्वसामान्यांचे सुखसमाधान यांच्यासाठी करतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. योग साधना माणसाचे केवळ शरीरच नव्हे, तर मनही बळकट करते, असे त्यांचे म्हणणे आहे. सातत्याने योग साधना केल्यास आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते. मनात सद्भाव निर्माण होते. वैश्विक सत्याचा अनुभव येतो आणि मानवाची आत्मोन्नती होते, असा या महाराजांचा अनुभव आहे.
या महाराजांचे सध्या चर्चेत असलेले वेशिष्ट्या असे की त्यांनी गेली 12 हून अधिक वर्षे आपला उजवा हात खाली केलेला नाही. याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचा उजवा हात या कालावधीत सदैव उंचावलेलाच ठेवला आहे. एकदाही त्यांनी तो कोणत्याही निमित्ताने खांद्याच्या खाली आणलेला नाही. त्यांनी या हठयोगाच्या साधनेचा प्रारंभ 2011 मध्ये केला. हे एक असामान्य व्रत होते. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ते निष्ठेने चालविलेले आहे. क्षणभरासाठीही त्यांनी ते मोडलेले नाही, असे नेहमी त्यांच्यासमवेत असणारे लोक स्पष्ट करतात. झोपेतही आपला हात खाली येऊ नये, याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांची नखे जवळपास एक फूट वाढली होती. हे महाराज उत्तर भारतातील सर्वात जुना मानल्या गेलेल्या ‘जुना आखाडा’चे सदस्य आहेत. हा आखाडा जसा सर्वात जुना आहे, तसाच तो सर्वात मोठाही आहे. हजारो साधूसंत या आखाड्याचे सदस्य आहेत. नुकतीच 2025 च्या महाकुंभमेळ्याची ‘पेशवाई’ साजरी करण्यात आली. त्यात सहस्रावधी साधूसंतांनी भाग घेतला होता. त्यांच्यात हे महाराजही होते. मात्र त्यांच्या या विशिष्ट व्रताने ते चर्चेचा विषय ठरले आहेत.









