सांताक्लॉज-ट्रीचे आकर्षण, ख्रिश्चन बांधवात उत्साह
बेळगाव : ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमस नाताळ अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ ख्रिसमससाठी सज्ज झाली आहे. विशेषत: ख्रिसमससाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे. यामध्ये आकर्षक ट्री, विद्युत माळा, ख्रिसमस स्टीकर, जिंगल बेल, विविध रंगी स्टार आदी साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. ख्रिश्चन बांधवांची खरेदीसाठी लगबग पहावयास मिळत आहे. ख्रिसमससाठी बाजारपेठेत विविध आकर्षक वस्तू दाखल झाल्या आहेत. पांगूळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, मेणसी गल्ली यासह इतर ठिकाणीही ख्रिसमसचे साहित्य दिसत आहे. विशेषत: कॅम्प परिसरात ख्रिसमसच्या तयारीला वेग आला आहे. चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून लगबग सुरू झाली आहे. याबरोबरच घराला रंगरंगोटी, आकर्षक सजावटीसाठी धडपड सुरू झाली आहे. विशेषत: मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री व विविध रंगाच्या शोभेच्या वस्तूंची खरेदी होत आहे.
स्पेशल गिफ्ट विक्रीसाठी दाखल
ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर खास ख्रिसमस स्पेशल गिफ्ट विक्रीसाठी ठेवले आहेत. यालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. विविध आकारातील स्टार आकर्षक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीची लगबगही दिसू लागली आहे. येत्या बुधवारी ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांकडून खरेदीला वेग येऊ लागला आहे.









