खानापुरातील आठ गावे दुर्लक्षित : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
बेळगाव : बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाला नियमितपणे व सुरळीत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली तर काहीच चुकीचे नाही. जिल्ह्यात 14 गावांना बससेवा नाही. यापैकी खानापूर तालुक्यातील तब्बल आठ गावांना बससेवा नसल्याने बेळगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची नेहमीच गैरसोय होत असते. बेळगावात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात बससेवा नसल्याची तक्रार मांडून त्यावर पर्याय मिळविण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपदे आहेत. आता आणखी एक मंत्रीपद देण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. येत्या काळात जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यातील आठ गावांना बससेवा उपलब्ध नाही. आमगाव, देवगाव, गवाळी, होलदा, हुळुंद, केळेकृष्णापूर, मेंढील, सातनळ्ळी, चिकोडी विभागातील पुगत्यानहट्टी, मीरापूरनट्टी, निपाणी तालुक्यातील अंमलझरी, रायबाग तालुक्यातील गिरीनायकनवाडी, गोकाक तालुक्यातील मलामरडी व गडीहोळी या गावांना बससेवाच नाही. येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना काही मैल अंतर चालत येऊन बससेवेचा लाभ घ्यावा लागतो.
रस्त्यांची समस्या
जिल्ह्यातील उपरोक्त 16 गावांना बससुविधा नसल्याने ग्रामस्थांनी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर रस्ते चांगले नाहीत. त्यामुळे बससुविधा देऊ शकत नाही, असे वरिष्ठ अधिकारी उत्तर देतात. पण नवे रस्ते करणे किंवा नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित खात्याने त्वरित काम हाती घेतले पाहिजे. गावांना रस्ते उपलब्ध झाल्यास बससेवा उपलब्ध होणार आहे. पण अनेकदा रस्ते कामासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ठळकपणे दिसून येतो.
खासगी वाहनांची मदत
खानापूर, चिकोडी, निपाणी, गोकाक या तालुक्यातील काही गावांना बससेवा उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना टेम्पो, रिक्षा, कॅब यासारख्या खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून बेळगाव, चिकोडी व धारवाड विभागाला दोन तालुके समाविष्ट करून तीन विभाग बनविण्यात आले आहेत. या तीन विभागांच्या कार्यक्षेत्रात 1208 महसूल गावे आहेत. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील 16 गावांना अद्याप बससेवा नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने तीन विभाग स्थापन करून तरी काय उपयोग झाला? असा प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्व क्षेत्रात प्रगती घडत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे जग जवळ येत आहे. आजचे युग वैज्ञानिक आणि सर्व सुविधांनीयुक्त जीवन असे म्हणत असताना बेळगाव जिल्ह्याच्या सोळा गावांना अद्याप साधी बस उपलब्ध नाही. याबद्दल आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.









