वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 साली होणाऱ्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच भारताला मिळाले असून सदर स्पर्धा नवी दिल्लीमध्ये घेतली जाईल, असे घोषणा विश्व पॅरा अॅथलेटिक्स संघटनेच्या प्रवक्त्याने केली आहे.
सदर स्पर्धा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये भरविली जाणार आहे. त्याच प्रमाणे 11 ते 13 मार्च दरम्यान होणाऱ्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स ग्रा.प्री.चे यजमानपद भारताला मिळाले असून ही स्पर्धा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरच घेतली जाणार आहे. भारतात 2025 सालातील स्पर्धा ही 12 वी विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. आशिया खंडामध्ये चौथ्यांदा ही स्पर्धा भरविली जात आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे 100 देशांचे किमान 1000 अॅथलिटस् सहभागी होणार आहेत. 2028 ची पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजिल्स येथे होणार असून या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून भारतातील 2025 ची पॅरा अॅथलेटिक्स विश्व चॅम्पियनशीप स्पर्धा महत्त्वाची राहिल.
भारताच्या पॅरा अॅथलिटसनी 2023 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना सहा सुवर्णांसह एकूण 17 पदके मिळविली होती. या यशामुळे अखिल भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीने देशातील पॅरा अॅथलिट्सवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 2029 ला होणाऱ्या विश्व अॅथलिटेक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.









