वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेले तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या मातेने सुभाष यांच्या पुत्राचा, म्हणजेच स्वत:च्या नातवाचा ताबा मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. सध्या या नातवाचा ताबा सुभाष यांच्या पत्नीकडे आहे. मात्र, पत्नीला, तसेच सुभाष यांच्या सासूसासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या सुभाष यांचा पुत्र नेमका कोठे आहे आणि त्याचा सांभाळ कोण करीत आहे, याविषयी माहिती उपलब्ध नाही. त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून ती टाळण्यासाठी त्याचा ताबा आपल्याला देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मुलाचा ताबा आपल्या आईला देण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार आता सुभाषच्या आईचे प्रयत्न होत आहेत.
अतुल सुभाष यांची पत्नी निकिता किंवा निकीता यांची आई यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, त्यांनी सुभाष यांच्या मुलाची कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आम्हाला मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. सध्या निकिता यांचे सारे कुटुंबच अटकेत असल्याने सुभाष यांचा पुत्र कोठे आहे, हे अज्ञात आहे. तो निकिता यांच्याजवळ नाही, एवढे निश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या मुलाचे वय अवघे चार वर्षांचे असल्याने तो स्वत:ला सांभाळण्याइतका मोठा नाही. त्यामुळे त्याला आपल्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणीही अतुल सुभाष यांना मातेने याचिकेत केली आहे.









