भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची कृती, शीखविरोधी हिंसाचाराचा या भेटीला संदर्भ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांना ‘1984’ असे मुद्रण असलेली बॅग भेट दिली आहे. त्यांच्या या कृतीची चर्चा शुक्रवारी संसद परिसरात आणि बाहेरही होत राहिली. काँग्रेसच्या काळात 1984 मध्ये शीखांच्या विरोधात भीषण दंगली घडल्या. या दंगली काँग्रेसच्या नेत्यांनीच घडविल्या होत्या, असा आरोप आहे. अनेक काँग्रेस नेत्यांवर आजही या दंगलींसंबंधातील अभियोग चालविले जात आहेत. या साऱ्या घटनाक्रमाचा संदर्भ या बॅगच्या भेटीला आहे, असे या पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
गेले काही दिवस प्रियांका गांधी वेगवेगळी वाक्ये मुद्रीत असलेल्या बॅग्ज संसदेत येताना घेऊन येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांची छायाचित्रे असलेली, पॅलेस्टाईनसंबंधीचा मजकूर असलेली आणि बांगला देशच्या हिंदूंच्या स्थितीचा उल्लेख असलेली अशा विविध प्रकारचा आशय मुद्रित असलेल्या बॅगा प्रियांका गांधी यांनी संसदेत आणल्या आहेत. आता भारतीय जनता पक्षानेही त्यांना प्रत्युत्तरासाठी ‘1984’ असे मुद्रण असलेली बॅग भेट म्हणून दिली आहे.
खोचक टिप्पणी
भारतीय जनता पक्षाच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी ही बॅग प्रियांका गांधी यांना अशी बॅग भेट देण्यामागचा हेतूही पत्रकारांसमोर स्पष्ट केला. प्रियांका गांधी यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्ज संसदेत घेऊन येण्याची हौस असल्याचे दिसून येते. त्यामुळे मीही त्यांना अशी एखादी बॅग देऊ इच्छित होते. शुक्रवारी मला ती संधी मिळाली. प्रथम त्या ही बॅग घेण्यास टाळाटाळ करीत होत्या. पण मी आग्रह धरल्याने त्यांनी ती स्वीकारली, अशी माहिती खासदार सारंगी यांनी दिली.
काँग्रेसची ‘दुखरी नस’
‘1984’ ही केवळ एक संख्या नाही. तर भारताच्या इतिहासातील काळे वर्ष आहे. याच वर्षी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर राजधानी दिल्ली आणि देशभरात अनेक स्थानी शीखविरोधी दंगलींचा आगडोंब उसळला होता. एकट्या दिल्लीत 4 हजारांहून अधिक निरपराध शीखांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. असंख्य शीखांची घरे आणि मालमत्तांची राखरांगोळी करण्यात आली होती. या दंगली काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीच घडवून आणल्या होत्या असा आरोप करण्यात आला आहे. सज्जनकुमार, जगदीश टायटलर, हरकिशनलाल भगत अशा अनेक मोठ्या काँग्रेस नेत्यांवर दंगलीसंबंधीचे अभियोग सादर करण्यात आले होते. आजही अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. वर्ष 1984 ही काँग्रेसची दुखरी नस आहे. या दंगलीतली काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका नेहमीच काँग्रेस विरोधी पक्षांच्या, विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या टीकेचे लक्ष्य राहिलेली आहे. त्यामुळे ‘1984’ असे मुद्रीत केलेली बॅग प्रियांका गांधींना भेट देऊन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचे एकत्र चित्र असलेली बॅग संसदेत आणून प्रियांका गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संदेश पसरविण्याचा प्रयत्न केला होता. आता ‘1984’ ची बॅग प्रियांका गांधी यांना भेट देऊन उट्टे काढले आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मिडिया आणि इतरत्र व्यक्त केली जात असल्याचे दिसून येते.
संबंधांमध्ये अधिकच दुरावा
सध्या भारताच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये पाया असलेले हे दोनच पक्ष सध्या राष्ट्रीय पातळीवर आहेत. तथापि, दोन्ही पक्षांमध्ये अनेक कारणांमुळे मोठा दुरावा आहे. गेल्या तीन दशकांमध्ये या दुराव्यात टप्प्याटप्प्याने वाढ झाली असल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षांची एकमेकांशी असलेली तीव्र स्पर्धा आता केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरती उरलेली नसून नेत्यांमधील व्यक्तीगत द्वेषाच्या पातळीवरही पोहचली असल्याचे दिसून येत आहे. संसदेत बॅगा आणणे किंवा बॅग भेट देणे या कृतींना अशी बरीच मोठी पार्श्वभूमी आहे, असे जाणवत आहे.
वेगवेगळ्या संदेशांच्या बॅगांची स्पर्धा
ड काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या बॅगांना भाजपचेही तसेच प्रत्युत्तर
ड संसदेच्या शीतकालीन अधिवेशानाच्या अखेरीच्या दिवशी बॅगेची भेट
ड भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधील दुराव्यात आता अधिक वाढ
ड संसदेचे शीतकालीन अधिवेनश अभूतपूर्व गोंधळात, शेरेबाजीत समाप्त









