दलित संघटनांकडून निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात गुरुवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती, तसेच विविध दलित संघटनांनी चन्नम्मा चौक येथे आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, तसेच अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करताना गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल संदिग्ध वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याविषयी असे वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांचा जोरदार निषेध करण्यात आला. अमित शहा यांच्या फोटोला फुल्या मारून त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. दलित संघर्ष समितीचे प्रमुख रवी बस्तवाडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध दलित संघटना सहभागी झाल्या होत्या.
बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बहुजन आघाडी बेळगावच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. अमित शहा यांनी तात्काळ आपले विधान मागे घेऊन देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. राजू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.









