शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : राज्यात 59 हजार 772 शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात गोपालय्या के. यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली आहे. गोपालय्या यांच्यातर्फे भाजपचे भैरती बसवराज यांनी प्रश्न विचारला. राज्यात सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे का? कंत्राटी पद्धतीवर किती शिक्षकांची नेमणूक केली आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी प्राथमिक शाळेचे 50 हजार 67 व माध्यमिक शाळेचे 9 हजार 705 शिक्षकांची कमतरता आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक शाळेसाठी 35 हजार व माध्यमिक शाळेसाठी 8 हजार 968 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 15 हजार शिक्षक भरती करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र 13 हजार 352 पैकी 12 हजार 521 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रभू चव्हाण यांनी औराद तालुक्यातील कन्नड शिक्षकांच्या कमतरता दूर करण्यासाठी ही मागणी केली.
मानधन वाढवण्यासंबंधी उपाययोजना
सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये सेवा बजावणाऱ्या अतिथी प्राध्यापकांचे मानधन वाढवण्यासंबंधी सरकारने उपाययोजना केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मानधन वाढवण्यात येईल, असे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे सी. सी. पाटील यांच्यातर्फे व्ही. सुनीलकुमार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अतिथी प्राध्यापकांना सध्या 12 हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. त्यांना 30 हजारवर नेणे सध्या शक्य नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.









