माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
खानापूर : तालुक्यातील माण येथील सखाराम महादेव गावकर यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गावकर यांचा पाय काढावा लागला आहे. अद्यापही त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि वनमंत्री ईश्वर खांड्रे यांना प्रत्यक्ष भेटून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. याची दखल घेऊन वनखात्याकडून सखाराम गावकर यांना वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी सुवर्ण विधानसौध येथे बुधवारी गावकर यांच्या पत्नी सुलोचना गावकर यांच्याकडे 10 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अर्बन ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, दीपक कवठणकर यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. गावकर कुटुंबीयांनी वनखात्याचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
उपचारादरम्यान काढला पाय
माण येथील शेतकरी सखाराम गावकर हे पत्नी सुलोचना यांच्यासह 1 डिसेंबर रोजी शेताकडे निघाले होते. यावेळी दोन अस्वलानी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांची पत्नी बचावासाठी जवळच्या झाडावर चढल्याने त्या बचावल्या. दोन्ही अस्वलानी सखाराम गावकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाचा चावा घेतल्यामुळे दोन्ही पायावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. उपचारासाठी बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण गंभीर जखम असल्याने उपचारादरम्यान त्यांचा एक पाय काढावा लागला होता. माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव अंजली निंबाळकर यांनी गावकर यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची बेळगाव अधिवेशनाच्या सुरवातीला भेट घेऊन सर्व कागदपत्रासह मंत्र्यांना सविस्तर माहिती देऊन तातडीने मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन बुधवारी विधानसौध येथे दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.









