दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर
वार्ताहर/येळ्ळूर
सुळगा (ये) ते देसूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काँग्रेसचे युवानेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला. सदर रस्ता या भागाच्या आमदार व महिला विकास व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या फंडातून मंजूर केला. अध्यक्षस्थानी सुळगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील होते. सुळगा ते देसूर क्रॉस पर्यंतच्या रस्त्याची फारच दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना फारच कसरत करावी लागत होती. लहान मोठे, अपघात तर नित्याचेच झाले होते. वारंवार याबाबत मागणी करूनही रस्त्याच्या कामाकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते.
याची दखल घेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या तीन कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करून कामाला सुरुवात केली. याबद्दल अरविंद पाटील यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कौतुक केले व निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले. गावकऱ्यांनी होणाऱ्या कामाच्या दर्जाकडे लक्ष देवून काम करून घ्यावे, काही समस्या असल्यास आमच्या निदर्शनास आणावे, त्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य विष्णू लोहार, प्रभाकर हाजगोळकर, महेश बस्तवाडकर, यल्लाप्पा कणबरकर, संदीप जाधव, अक्षय पाटील यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी, पीडीओ, अंगणवाडी कर्मचारी, भावकेश्वरी व नेताजी हायस्कूलचे शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.









