मादिग समाजासह अन्य उपजातींची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने तात्काळ सदाशिव आयोग लागू करावा, यानुसार मादिग समाजासह अन्य उपजातींनाही याचा फायदा होणार आहे. मात्र यामध्ये सरकार चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी मादिग समाजातर्फे येडियुराप्पा मार्गावरील अलारवाड ब्रिजजवळ आंदोलन छेडण्यात आले. 30 वर्षांपासून समाजबांधव आंदोलन करीत आहेत. भाजपच्या मागील सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. दरम्यान, न्यायालयाने ज्या त्या राज्यात सरकारने ते लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यातील सरकारने ते लागू करण्यास चालढकल केली आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी समाजबांधवांनी एकत्रित येत आंदोलन छेडले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा
राज्यातील सर्व आमदारांच्या व प्रतिनिधींच्या घरासमोर मादिग समाजातर्फे हलगी वादन करून लक्ष वेधले जाणार होते. यापैकी शेकडो आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मादिग वंचित समाजाला आरक्षणापासून दूर रहावे लागले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने तात्काळ सदाशिव आयोग लागू करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.









