कोल्हापूर :
गेल्या आठ ते दहा दिवसापांसून तापमानात कमालीची घट होत असुन थंडीचा कडाका वाढतच आहे. किमान तापमान 14 अंश डिग्री सेल्सियसच्या खाली आले असून वाढत्या थंडीने जिल्हा गारठला आहे. दिवसभर ऊन असले तरी हवेत गारठा कायम असल्याने नागरिकांची उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
पहाटे साधारण धुके तर सकाळपासून प्रचंड गारठा जाणवत आहे. दिवसभर वातावरण निरभ्र असले तरी बोचरी थंडी जाणवत आहे. नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडत आहेत. वातावरणात चांगलीच हुडहुडी वाढत असुन पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तरेकडील राज्यात पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात थंडीची लाट आहे. उत्तरेकडून राज्यात शितरहीत लहरी येत आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात घट होणार असुन थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.
सायंकाळनंतर तापमान घसरत असून रात्री गारठ्यामध्ये वाढ होत आहे. रात्री वाढत्या थंडीमुळे काही भागात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडी वाढत असुन सर्दी, ताप, खोकला व घशाचे रूग्णांत वाढ होत आहे. लहान मुले, वृद्धांसह दमा, अस्थमा, फुफुसाचे आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, गरम पदार्थांचे सेवन करावे, कोणतेही लक्षण दिसताच तज्ञांकडून उपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गुरूवारी किमान तापमान 14 अंश डिग्रीसेल्सियस तर कमाल तापमान 30 अंश डिग्रीसेल्सियसची होते.
अशी असेल तापमानाची सरासरी (डिग्री सेल्सियसमध्ये)
वार किमान कमाल
शुक्रवार 14 अंश 30 अंश
शनिवार 13 अंश 30 अंश
रविवार 13 अंश 31 अंश
सोमवार 16 अंश 28 अंश
मंगळवार 16 अंश 28 अंश
बुधवार 16 अंश 28 अंश








