कबड्डी..पारंपरिक भारतीय खेळांमध्ये अग्रणी राहिलेला प्रकार…हा खेळ जरी पारंपरिकपणे मातीच्या मैदानावर खेळला गेलेला असला, तरी सध्या अनेक लोकप्रिय कबड्डी स्पर्धा आयताकृती मॅटवर खेळविल्या जातात. या मॅटचा आकार वरिष्ठ पुऊषांच्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धांसाठी 13 मीटर × 10 मीटर, तर महिलांसाठी 12 मीटर × 8 मीटर असतो…
- कबड्डी मॅटच्या चार बाह्य रेषांना सीमा किंवा ‘एंड लाइन्स’ म्हणतात. खेळ त्याच्या आत मर्यादित राहणं आवश्यक…आयताकृती मॅटची ही जागा मध्यरेषेनं दोन समान भागांमध्ये विभागलेली असते…
- प्रत्येक अर्ध्या भागात मध्यरेषेला समांतर आणखी दोन रेषा काढल्या जातात. ‘बॉल्क’ रेषा मध्यरेषेपासून 3.75 मीटर अंतरावर, तर ‘बोनस’ रेषा ‘बॉल्क रेषे’पासून 1 मीटर पुढे…दोन्ही लांब बाजूंनी सीमेच्या आत 1 मीटर अंतरावर दोन रेषा असतात. सीमा नि या रेषांमधल्या जागेला ‘लॉबी’ म्हटलं जातं…
- पुरुषांचा कबड्डी सामना 40 मिनिटं चालतो. त्यात प्रत्येकी 20 मिनिटांची दोन सत्रं (महिला गटात प्रत्येकी 15 मिनिटांची दोन सत्रं). प्रत्येक संघाला प्रत्येक सत्रात दोन ‘टाइम-आउट’ची परवानगी असते…प्रत्येक संघात सात खेळाडू असतात अन् तीन ते पाच बदली खेळाडू देखील ठेवता येतात…
- कबड्डीच्या नियमांनुसार, एका संघानं दुसऱ्या संघावर केलेल्या चढाईने सामना सुरू होतो. यावेळी चढाई करणाऱ्या संघातील कोणताही एक खेळाडू (ज्याला ‘रेडर’ म्हणतात) ‘कबड्डी’ या शब्दाचा जप करत प्रतिस्पर्ध्यांच्या भागात प्रवेश करतो. एक किंवा अनेक विरोधी खेळाडूंना स्पर्श करणं आणि दम कायम राखत मध्यरेषा ओलांडून परत येऊन गुण कमावणं हे त्याच्यासमोरील उद्दिष्ट…
- दुसरीकडे, प्रतिस्पर्धी संघ ‘रेडर’ला यशस्वीरीत्या परतण्यापासून रोखण्याकरिता त्याला पकडण्याचा किंवा मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो…त्यात यशस्वी झाल्यास ‘रेडर’ बाद होऊन एक ‘टॅकल पॉइंट’ मिळतो…
- ‘रेडर’ला पाय किंवा धड पकडूनच रोखता येतं…मात्र याभरात प्रतिस्पर्ध्यांनी तो कबड्डीचा जप करत व दम राखत सरपटत जाऊन मध्यरेषेला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा पकडणारे खेळाडू बाद होऊन ‘रेडर’ला गुण मिळतात…
- ‘रेडर’ जितक्या खेळाडूंना स्पर्श करतो तितके प्रतिस्पर्धी खेळाडू बाहेर पडतात अन् तितक्या प्रमाणात त्याला ‘टच पॉइंट्स’ मिळतात…मात्र प्रतिस्पर्धी संघातील ‘रेडर’नी आपल्या चढायांच्या वेळी विरोधी खेळाडूंना स्पर्श केल्यास हे बाहेर पडलेले खेळाडू त्या प्रमाणात अन् ज्या क्रमानं बाहेर पडले त्याच क्रमानं संघात परतू शकतात…
- जर एखाद्या ‘रेडर’नं चढाईच्या दरम्यान कब•ाrचा जप बंद केला वा आपला दम गमावला, तर देखील तो बाहेर पडतो आणि प्रतिस्पर्ध्यांना एक गुण मिळतो…
- जर एखाद्या संघानं विरोधी संघाच्या सर्व सात खेळाडूंना बाद केले, तर त्यांना ‘ऑल आउट’ किंवा ‘लोण’द्वारे दोन अतिरिक्त गुण मिळतात. एका संघानं ‘लोण’ची नोंद केल्यानंतर विरोधी संघातील सर्व सदस्य परत येऊन खेळ पुन्हा सुरू होतो…
- जर रेडर ‘बॉल्क लाइन’ ओलांडू शकला, तर तो बाद न होता सुरक्षितपणे परत येऊ शकतो. तथापि, फक्त तेवढ्याने गुण मिळत नाहीत किंवा बाद झालेले खेळाडू परत येऊ शकत नाहीत. या प्रकाराला ‘खाली चढाई’ म्हटलं जातं…
- ‘रेडर’ला गुण मिळविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ‘बोनस पॉइंट’. त्यासाठी रेडरला ‘बोनस लाइन’ ओलांडून मागील पाय हवेत असताना एक पाय आत ठेवावा लागतो. तथापि, बोनस पॉइंट फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा प्रतिस्पर्धी संघाकडे मॅटवर सहा किंवा त्याहून अधिक खेळाडू असतात…
- तसंच खेळाच्या दरम्यान जर एखादा ‘डिफेंडर’ किंवा ‘रेडर’ सीमारेषेच्या बाहेर गेला, तर तो बाहेर पडतो आणि विरोधी संघाला एक गुण मिळतो नि बाहेर पडलेला आपला एक खेळाडू परत आणण्याची संधीही मिळते…
- दोन्ही संघ आळीपाळीन एकमेकांवर चढाया करत राहतात आणि वेळ संपल्यानंतर सर्वांत जास्त गुण मिळविणारा संघ सामना जिंकतो…जर नॉकआउट कब•ाr सामना बरोबरीत सुटला, तर विजेता निश्चित करण्यासाठी दोन सत्रांसह सात मिनिटांचा मिनी सामना खेळवला जातो…जर अतिरिक्त वेळेतही विजेता निश्चित झाला नाही, तर सामन्याचं भवितव्य ‘सडन डेथ गोल्डन रेड’द्वारे ठरविलं जातं. तरीही बरोबरी झाली, तर नाणेफेकीनं विजेता निश्चित होतो…
– राजू प्रभू









