43 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानाचा होणार दौरा : द्विपक्षीय संबंध होणार बळकट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21-22 डिसेंबर रोजी कुवैतच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी तेथे कुवैतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबाह यांच्या निमंत्रणानुसार जात आहेत. कुठल्याही भारतीय पंतप्रधानाचा 43 वर्षांच्या कालावधीतील हा पहिला कुवैत दौरा ठरणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे कुवैतच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेत चर्चा करणार आहेत. तसेच कुवैतमध्ये राहत असलेल्या भारतीयांशी पंतप्रधान मोदी संवाद साधतील. कुवैत आणि भारत पारंपरिक स्वरुपात अत्यंत घनिष्ठ देश राहिले आहेत. दोन्ही देश मजबूत आर्थिक संबंध आणि लोकांमधील थेट संपर्काने जोडले गेले आहेत.
मध्यपूर्वेत मोठी उलथापालथ सुरू असताना पंतप्रधान मोदींचा हा दौरा होत आहे. कुवैत सध्या आखाती सहकार्य परिषदेचे (जीसीसी) अध्यक्षत्व करत असून या संघटनेसोबतच्या सहकार्यासमवेत रणनीतिक स्वरुपातही हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी कुवैतचे विदेशमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांनी भारताचा दौरा केला होता आणि त्याचदरम्यान त्यांनी मोदींना कुवैत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. जीसीसीच्या वर्तमान अध्यक्षत्वाच्या अंतर्गत भारत आणि जीसीसीमधील सहकार्य मजबूत होणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले होते. अब्दुल्ला अल-याह्या यांनी स्वत:च्या दौऱ्यात विदेशमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली होती. अब्दुल्ला यांचा हा दौरा भारत आणि कुवैत यांच्यादरम्यान बहुआयामी संबंध आणखी मजबूत करणारा असल्याचे उद्गार विदेश मंत्रालयाने काढले होते.
भारतासोबत चांगले संबंध
कुवैत हा भारताचा आघाडीचा व्यापारी भागीदार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात द्विपक्षीय व्यापार 10.47 अब्ज डॉलर्सचा राहिला. कुवैत हा भारताचा सहाव्या क्रमांकाचा कच्चे तेल पुरवठादार आहे. कुवैतकडून भारताच्या ऊर्जा गरजांपैकी 3 टक्क्यांपर्यंत पूर्तता होते. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या 79 व्या सत्रादरम्यान कुवैतचे युवराज शेख सबा खालिद अल-हमद अल मुबारक अल-सबा यांची भेट घेतली होती. ही दोन्ही नेत्यांमधील पहिलीच भेट होती.
दौरा का महत्त्वाचा?
कुवैतमध्ये 10 लाखाहून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. हा देश भारताला कच्चे तेल तसेच लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा करतो. कुवैत आखाती सहकार्य परिषदेतील एकमेव असा देश आहे, जेथे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेली नाही. मोदींचा हा दौरा भारत-कुवैत संबंध मजबूत करण्यासोबत आखातात भारताची कूटनीतिक आणि आर्थिक उपस्थिती वाढविण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. कुवैतने अलिकडेच जीसीसी देशांच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते, ज्यात कुवैतने गाझामध्ये त्वरित संघर्षविराम लागू करण्याचे आवाहन केले होते. भारताने पश्चिम आशियातील संघर्ष रोखणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले आहे. जीसीसीमध्ये कुवैतसमवेत संयुक्त अरब अमिरात, बहारीन, सौदी अरेबिया, ओमान आणि कतार यांचा समावेश आहे.









