वृत्तसंस्था/संभल
उत्तरप्रदेशच्या संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार जिया उर रहमान यांच्या निवासस्थानी वीज विभागाने मोठी कारवाई केली आहे. खासदार रहमान यांच्यावर वीजचोरीचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात वीजचोरी विरोधी कायद्यातील कलम 135 अंतर्गत एफआयआर नेंदविण्यात आला आहे. आता खासदाराच्या निवासस्थानाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. खासदाराच्या घरात झिरो मीटर रीडिंग आल्यावर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आहे. सप खासदार जिया उर रहमान बर्क हे जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्यावरच वीजचोरीचा हा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. समितीचे मुख्य काम जिल्ह्यातील वीजचोरी रोखणे आहे, परंतु खासदाराच्या घरातच झिरो मीटर रीडिंग आढळून आले आहे. प्रशासनाने झिरो मीटर रीडिंग मिळाल्यावर चौकशी सुरू केला असता वीजचोरीचा प्रकार समोर आला.
वीज तपासणी आणि नव्याने लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या रीडिंग तपासणीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. खासदाराच्या घरात लावलेल्या 2 मीटर्समध्ये फेरफार करण्याचे पुरावे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी वीज विभागाने खासदाराच्या घरातील जुने मीटर हटविले होते, त्यांना ताब्यात घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. खासदाराच्या घरातील वीजेच्या बिलात वर्षातील रीडिंग झिरोच आहे. कारवाईदरम्यान शीघ्र कृती दलासोबत पीएसीचे जवान तैनात करण्यात आले होते. यापूर्वी मागील वेळी वीज विभागाचे पथक पाहणीसाठी गेले असता समाजकंटकांकडून गैरवर्तन करण्यात आले होते. या प्रकाराचे चित्रिकरण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.









