कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार 17 जानेवारी 2025 रोजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात होणार आहे. या समारंभाच्या नियोजनासाठी विविध समित्या नेमल्या आहेत. या समित्यांना विविध प्रकारची कामे नेमूण दिली जातात. त्यामुळे सध्या प्रमुख पाहुणे, पदवी प्रमाणपत्रांची छपाई यासह अन्य कामाची लगबग सुरू आहे. विद्यापीठातील समित्यांचे बैठका सत्र सुरू असून नियमानुसार काम करण्याच्या सुचना एका परिपत्रकाव्दारे विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.
दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, बैठक व्यवस्था, दीक्षांत पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्राचे वाटप, व्यासपीठावरील मान्यवरांचा ड्रेसकोड, यासह अन्य कामे नेमूण दिली जातात. त्यासाठी समित्या तयार केल्या आहेत. दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण होणार असल्यामुळे सर्वांनी उत्तम प्रकारे व जवाबदारीने काम करण्याच्या सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दीक्षांत समारंभाच्या कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्या कर्मचाऱ्यांना इतर कामे देवू नये, असे विभागप्रमुखांनी सांगण्यात आले आहे. दीक्षात समारंभाच्या कामाला प्राधान्य देवून सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना परिपत्रकाव्दारे देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांनी या सूचनांचे पालन करावे
61 व्या दीक्षांत समारंभाकडील विविध समित्यांना दीक्षांत समारंभासाठी जर आवश्यक साहित्य खरेदी करावयाचे असेल तर त्याबाबत परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालकांची प्रशासकीय पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे. तसेच समारंभानंतर एक आठवडयात संपूर्ण खर्चाच्या तपशीलासह देयके दोन प्रतिमध्ये (मूळ प्रत व त्याची सत्य प्रत) दीक्षांत विभागाकडे पाठवावी. पूर्वमान्यता न घेता देयक सादर केल्यास ते लेखा विभागाकडे पाटवले जाणार नाही.
दीक्षांत समारंभा दिवशी वर्ग-4 मधील सर्व सेवकांनी कार्यालयीन ओळखपत्र व कार्यालयाने पुरविलेले गणवेश टोपीसह परिधान करणे बंधनकारक आहे.
दीक्षांत समारंभ कामाच्यावेळी संबंधित शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर सेवकांनी कोणतीही रजा काढू नये, किंवा वरिष्ठांनी शिफारस करू नये. दीक्षांच्या कामाचे आदेश रद्द करण्याबाबत शिफारस करू नये. दीक्षांत समारंभाची रूपरेषा अंतिम झाल्यानंतर आवश्यक त्या सुचना समिती प्रमुखांना दिल्या जातील.








