वक्फ नोटीशींवर मंत्री जमीर अहमद यांचे स्पष्टीकरण, विरोधी पक्षाकडून मात्र सभात्याग
बेळगाव : वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर बुधवारी सत्ताधारी व विरोधी पक्षात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. वादावादीनंतर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वक्फमंत्री जमीर अहमद, महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी या मुद्द्यावर समर्थपणे उत्तर दिले. वक्फच्या जागेवर जर एखादे मंदिर असेल, ही जागा एखादा शेतकरी कसत असेल तर आम्ही त्याला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत देण्यात आली. बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजणार आहे. त्यामुळे अद्याप भरपूर कामकाज शिल्लक आहे. सभाध्यक्षांनी बुधवारी भोजन विराम न देता सातत्याने कामकाज चालवले. दुपारी वक्फमंत्री जमीर अहमद यांनी वक्फ बोर्डकडून आलेल्या नोटीशीच्या मुद्यावर विधानसभेत उत्तर दिले. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांसह भाजपच्या आमदारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
वक्फ अदालत हाती घेतल्यानंतर विजापुरात झालेल्या वक्फ अदालतीसाठी आपण बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनाही निमंत्रित केले होते. मात्र, ते आले नाहीत. तेथूनच वाद सुरू झाला. वक्फ बोर्डच्या नोटीसीसंबंधी खोटी माहिती पसरवण्यात आली. राज्यात 1 लाख 28 हजार एकर इतकी वक्फची मालमत्ता आहे. सध्या 20 हजार 54 एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. 92 हजार एकर जमीन त्यांना मिळाली नाही. ‘इनाम रिग्रँट’नुसार 47 हजार 263 एकर जमीन त्यांच्या हातून निसटली. 20 हजार एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अतिक्रमण करणाऱ्यांपैकी 95 टक्के मुसलमान आहेत. आम्ही जमिनीवर ताबा घेणार, असा खोटा प्रचार करण्यात आला. भाजपच्या राजवटीतच मोठ्या प्रमाणात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत, असे जमीर अहमद यांनी सांगितले. याला विरोधी पक्षनेते आर. अशोक, उपनेते अरविंद बेल्लद यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चर्चेत हस्तक्षेप करीत जमीर अहमद यांना बोलू द्या, अशी सूचना केली.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर विरोधी पक्षनेते बोलताना काँग्रेसचे अनेक आमदार मध्ये मध्ये हस्तक्षेप करतात. ते योग्य आहे का? असा प्रश्न भाजपच्या आमदारांनी उपस्थित केला. लोकशाहीत व संसदीय चौकटीत प्रश्न विचारावा लागणार आहे. काही विचारू नका, असे आपण कोणाला सांगू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर जमीर अहमद यांनी वक्फ बोर्डच्या नोटीसीसंदर्भात पुन्हा माहिती दिली. भाजपच्या राजवटीतच वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमणासंबंधी सहा आदेश जारी करण्यात आले आहेत. याकडे लक्ष वेधले. यावेळी भाजप-काँग्रेसमध्ये वादावादी वाढली. श्रीरंगपट्टणमधील मंदिराला नोटीस का दिला? अशी विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली. लगेच जमीर अहमद यांनी चुकीच्या पद्धतीने नोटीसा गेल्या असतील तर त्या आम्ही मागे घेतो, असे जाहीर केले. शेतकरी व मंदिरांना नोटीसा पाठवल्या नाहीत. तरीही पाठवलेल्या नोटीसा मागे घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वक्फ जमिनीवर एखादे मंदिर असले तरी त्याला आम्ही हात लावणार नाही, अशी भूमिका पुन्हा जमीर अहमद यांनी मांडली.
चुकीच्या पद्धतीने वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर खोटा प्रचार केल्यामुळेच पोटनिवडणुकीत मतदारांनी तुम्हाला अद्दल घडवली आहे. मी मुसलमान आहे, मात्र हिंदुस्थानी कन्नडीग आहे, या मुद्द्यावर राजकारण करू नका. खरोखरच वक्फ बोर्डकडून कोणावर अन्याय झाला असेल तर आपण स्वत: तेथे येतो, चला, असे उघड आव्हान जमीर अहमद यांनी दिले. त्यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंबंधीचे पुढील उत्तर महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा देतील, असे सांगितले. भाजप नेत्यांनी याला आक्षेप घेतला. वक्फशी संबंधित मंत्री जमीर अहमद आहेत. त्यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री अरग ज्ञानेंद्र, उपनेते अरविंद बेल्लद आदींनी याला आक्षेप घेतला. शेवटी बसवराज रायरेड्डी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. एखाद्या विषयावर संबंधित मंत्र्यांबरोबरच इतर मंत्रीही उत्तर देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी यासंबंधी रुलिंग दिल्यानंतरही भाजपने जमीर अहमद यांनीच उत्तर द्यावे, या मागणीवर ठाम राहिले.
तुमची मागणी लोकशाहीविरोधी आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कृष्ण भैरेगौडा यांनी उत्तर देण्यास सुचवले. त्यावेळी सभागृहात गदारोळ वाढला. मुडाचे भूखंड परत केला आहे, तसे वक्फ बोर्डकडून दिलेल्या नोटीसा परत घ्या, अशी मागणी करीत भाजपच्या आमदारांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यावेळी भाजपने सभात्याग केला. भाजपचे मित्रपक्ष असलेले निजदचे आमदार मात्र सभागृहात बसून होते. विरोधी पक्षाच्या सभात्यागानंतर कृष्ण भैरेगौडा यांनी वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर माहिती दिली. भाजपचा प्रचारच मुळात खोटा आहे. जे अतिक्रमण झाले आहे, त्यांनाच नोटीसा देण्यात आल्या आहेत. सरकार कोणतेही असले तरी ही प्रक्रिया चालते. केवळ वक्फ बोर्डच नव्हे तर धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या मंदिरांच्या जमिनीवरील अतिक्रमणही हटवण्यात येत आहे. याविषयी शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली आहे. खोट्या आरोपांची मालिकाच चालविण्यात आली. मुसलमान हिंदूंची मालमत्ता काढून घेणार, असा प्रचार करण्यात आला. हा प्रचार खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.
कायमचा तोडगा काढण्याची गरज
वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर उत्तर देताना जमीर अहमद यांनी मशिदीत शिवलिंग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तसे प्रयत्न करीत नाही. जर वक्फच्या जागेवर एखादे मंदिर असले तरी त्याला आम्ही हात लावणार नाही, असे जाहीर केले. त्यावर माजी मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी मशीद पाडवून कोठेही मंदिर बांधण्यात आले नाही, हा इतिहास आहे. मंदिरे पाडवून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. जुना असला तरी हा इतिहास आहे, असे त्यांनी सांगितले. मुघलांच्या राजवटीत मंदिरांवर हल्ले झाले. या मुद्द्यावर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे, असे डॉ. अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.









