चर्मकार समाजातर्फे आंदोलन, विशेष अनुदानाची मागणी
बेळगाव : समगार, मोची आणि ढोर या उपनावाने असणाऱ्या जातींचा चर्मकार या एकाच गटामध्ये समावेश करावा, पुढील जातनिहाय गणतीवेळी चर्मकार अशी नोंद करावी, स्थानिक निवडणुकांबरोबर इतर निवडणुकांमध्ये समाजाचा विचार करावा, समाजासाठी शैक्षणिक संस्था उपलब्ध कराव्यात, आदी मागण्यांसाठी मंगळवारी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेतर्फे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या चर्मकार समाज मागासलेला आहे. अशा परिस्थितीत समाजासाठी अनुदान मंजूर करावे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या या समाजासाठी शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हैदराबाद आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातही चर्मकार समाजाच्या उपजातीचे लोक राहतात. या सर्व उपजातींचा समावेश चर्मकार या गटामध्येच करावा, चर्मकार समाजाच्या विकासासाठी कोणतेही विशेष अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे समाज मागासलेला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी विशेष अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आरक्षण लागू करावे, अशी मागणीही केली आहे.









