कसोटीत अनेक विक्रम : सर्वोत्तम अष्टपैलू ते दिग्गज गोलंदाज असा अविस्मरणीय प्रवास
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णित झाल्यानंतर अश्विनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या उपस्थित त्याने निवृत्ती जाहीर केली. ही घोषणा करण्यापूर्वी टीम इंडियाने अश्विनला गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी त्याने सहक्रायांनी दिलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. यानंतर त्याने रोहित शर्माला मिठी मारली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये अश्विनने विराट कोहलीला आलिंगन दिले. यावेळी देखील तो भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वीच निवृतीचा विचार डोक्यात असल्याचे अश्विनने कुटुंबीयांना सांगितले होते. घरच्यांनी त्याला विचार करण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, कोणाला संघात संधी मिळते आहे हे पाहून निर्णय घेण्याचे त्याने ठरवले होते. मंगळवारी रात्री अश्विनने आपल्या घरच्यांना 18 डिसेंबर त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा दिवस असेल असे सांगत सर्वांना धक्का दिला. आपल्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने भारताचे कसोटी विश्व खऱ्या अर्थाने गाजवले. अनिल कुंबळेनंतर कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा मान अश्विनने पटकावला आहे. त्याच्या गोलंदाजातील विविधता, कॅरम बॉल, सतत शिकत राहण्याच्या वृत्तीने त्याला यशस्वी बनवले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अनोख्या शैलीने आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या अश्विनने आपल्या गुणवत्तेने महान बनवले आहे. आता, ब्रिस्बेन कसोटीनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. पण, आयपीएल व रणजी क्रिकेटमध्ये तुर्तास तरी खेळणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
अश्विनची अविश्वनीय कामगिरी
- भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज (765)
- जगात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन सातवा
- कसोटीत सहा शतकांसह 3503 धावा
- कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स (195)
- कसोटी इतिहासात सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा संयुक्त दुसरा क्रमांक (37)
- सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेट्स पटकावणारा गोलंदाज
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर (11वेळा) पुरस्काराने सन्मानित.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 302 वेळा फलंदाजांना पायचीत टिपणारा केवळ तिसरा गोलंदाज.
- 2011 चा एकदिवसीय विश्वचषक विजेता
- 2013 चा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता
- आशिया कप 2010 चा विजेता
- 2016 चा आयसीसी पुरुषांचा क्रिकेटर ऑफ द इयर
- 2016 चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर
250 कसोटी विकेट्स घेणारा सर्वात जलद (45)
300 कसोटी विकेट्स घेणारा सर्वात जलद (54)
भारतासाठी सर्वाधिक 350 कसोटी विकेट्स घेणारा संयुक्त दुसरा क्रमांक (66)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके (11)









