फील्ड फायरिंग रेंजमधील सरावावेळी दुर्घटना
वृत्तसंस्था/ बिकानेर
राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमध्ये सराव करताना झालेल्या स्फोटात दोन जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने सुरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात आशुतोष मिश्रा आणि जितेंद्र यांचा मृत्यू झाल्याचे संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अमिताभ शर्मा यांनी सांगितले. मृतांपैकी मिश्रा हा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील तर, जितेंद्र हा राजस्थानमधील दौसा येथील रहिवासी आहे. दोघांचेही पार्थिव सुरतगड मिलिटरी स्टेशनमध्ये नेण्यात आले असून ते त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येतील.
राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे प्रशिक्षणादरम्यान रणगाड्यात दारूगोळा भरत असताना स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या आठवड्यातील फायरिंग रेंजवरील ही दुसरी जीवघेणी घटना आहे. बुधवारी झालेल्या घटनेत स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यापूर्वी रविवार 15 डिसेंबर रोजी गन कॅरेजमध्ये स्फोटके भरत असताना गनर चंद्रप्रकाश पटेल याचा मृत्यू झाला होता.









