वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकऱ्यांसाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे असून त्यांच्या कोणत्याही मागण्या घेऊन ते न्यायालयात येऊ शकतात, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालायने केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करणारे नेते डल्लेवाल यांच्या प्रकृतीचीही न्यायालयाने विचारपूस केली. ते लोकनेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची योग्य प्रकारे निगा प्रशासनाने घ्यावी, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुईंया यांच्या खंडपीठासमोर बुधवारी पुन्हा झाली. शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालय स्थापित समितीशी चर्चा करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. मागच्या सुनावणीत आम्ही जे आदेश दिले होते, त्यांचे काय झाले, अशी पृच्छाही न्यायालयाने केली. न्यायालयाच्या आदेशानंतर उपोषण करणारे नेते डल्लेवाल यांच्याशी विस्तृत चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण पंजाबच्या राज्य सरकारी प्रतिनिधींनी दिले. डल्लेवाल यांच्या प्रकृतीवर शासनाचे लक्ष असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या शरिरातील सर्व गात्रे व्यवस्थित काम करीत असून चिंतेचे कारण नाही. मात्र, त्यांनी उपोषण सोडण्यास किंवा कोणतेही औषधोपचार करुन घेण्यास नकार दिला असल्याने प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली. यावेळी न्यायालयाने शेतकऱ्यांसाठी आपले दरवाजे केव्हाही उघडे आहेत, अशी टिप्पणी केली.
त्वरित उपाय करा
डल्लेवाल यांच्या प्रकृतीकडे शासनाने दुर्लक्ष करु नये. त्यांची वारंवार तपासणी केली जावी. त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करावी. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात आणि संपूर्ण राज्यप्रशासनाला दोषी धरले जाऊ शकते, अशा कठोर इशाराही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.









