शनिवारी पावसाची शक्यता
पणजी : राज्यात शीतलहर पसरली असून सोमवारी कडाक्याची थंडी पडली आणि त्याचा परिणाम मंगळवारी सकाळीही जाणवत होता. पणजीत 19 डिग्री सेंटीग्रेड तर वाळपई आणि सांखळी येथे तब्बल 12 डिग्री सेंटीग्रेड एवढे तापमान खाली आले होते. गोव्यात गेल्या तीन दिवसात तापमान बरेच खाली आले. येत्या शनिवारी व रविवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दक्षिण भारतात पावसाळी ढग जमले असून ते पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्याने कर्नाटकातून हा पाऊस गोव्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्रीच्या वेळी पारा पणजीमध्ये 19 डिग्री सें. तर वाळपई आणि साखळी येथे 12 डिग्री सेंटीग्रेड एवढा पारा खाली उतरला होता. एक्यू वेदर या हवामान क्षेत्रातील नामांकित संस्थेने हा पारा एवढा खाली आलेला दाखविला आहे. हवामान खात्याने तो 17 डिग्रीपर्यंत दाखविलेला आहे. गेले तीन दिवस सत्तरी, सांखळी व दुर्गम भागात कडाक्याची थंडी पसरली आहे. आजही पारा 17 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या गोव्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव ग्रामीण भागातील जनता घेत आहे. आज व उद्या थंडी 19 ते 20 डिग्री सें.पर्यंत राहील. त्यानंतर शुक्रवारी आपसुकच पारा वर जाईल आणि शनिवारी 19 ते 20 डिग्री सें. एवढ्या वातावरणातच पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.









