उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची माहिती
बेळगाव : बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी स्वीकारले होते. कर्नाटकाला मिळालेले हे ऐतिहासिक भाग्य म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. मंगळवार दि. 17 रोजी सरकारी विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींसमोर शिवकुमार बोलत होते. काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी तर गंगाधरराव देशपांडे व जवाहरलाल नेहरु यांनी मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. त्याकाळात गंगाधर देशपांडे यांनी बेळगावात अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरविण्यात यावे, अशी मागणी केली होती, अशी आठवण शिवकुमार यांनी सांगितली.
काँग्रेस अधिवेशनासाठी जमणाऱ्या जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावात विहीर खोदली होती. या विहिरीला आज ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाचे काँग्रेसचे अधिवेशन साबरमती आश्रमात (गुजरात) भरविण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र बेळगावातील काँग्रेसच्या अधिवेशनाला शतकपूर्ण झाल्याबद्दल ते बेळगावातच भरविण्यात यावे, असा प्रस्ताव आपण ठेवला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाल्याचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.
‘गांधी भारत’च्या निमित्ताने मागील 2 ऑक्टोबरपासून राज्य सरकारतर्फे बेंगळूरच्या गांधी भवनापासून विधानसौध आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर गांधी चौकापासून भारत जोडो भवनापर्यंत पदयात्रा झाली होती, असे त्यांनी सांगितले. बेळगावात होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांसह काँग्रेसच्या सर्व कार्यकारी समिती सदस्यांचे बेळगावात आगमन होणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जनता मेळावा होणार आहे. कार्यक्रमस्थळाला अ. भा. काँग्रेसचे मुख्य सचिव भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर अधिवेशनातील इतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
सिद्धरामय्यांकडून कोणावरही अन्याय नाही
पंचमसाली समाजाने आरक्षणासाठी आंदोलन चालविले असताना मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली नाही, सिद्धरामय्या यांनी पंचमसाली समाजावर अन्याय केला आहे, असे बसवजय स्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. सिद्धरामय्यांनी कोणावरही अन्याय केलेला नाही, असे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.









