कोल्हापूर :
कोल्हापूर जिह्याला वरदायीनी ठरलेल्या काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. या धरणावर लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षात गळती काढण्याचे हे काम प्रलंबित राहिले आहे. अखेर दुरुस्तीच्या कामाची निविदा होऊन वर्कऑर्डर देखील झाली आहे. औरंगाबाद येथील शिवाज् स्ट्रक्चर या कंपनीला हे काम दिले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात धरण दुरुस्तीसाठी नियुक्त पेलेल्या तज्ञ समितीची बैठक होणार असून जानेवारीपासून प्रत्यक्ष गळती काढण्याचे काम सुरु केले जाणार आहे, अशी माहिती पांटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता (बांधकाम कक्ष) ए.एस.पवार यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
काळम्मावाडी धरण हे कोल्हापूर जिह्यातील 41 हजार हेक्टरवरील शेतीला वरदान ठरले आहे. लाखो लोकांची तहान भागवण्याचे काम हे धरण करीत आहे.काही वर्षांपासून काळम्मावाडी धरणाला गळती असल्याने लाखो लीटर पाणी वाया जाते यासाठी शासनाकडून 80 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.तज्ञ समितीने धरण सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजनेचे काम सुरू होईतोपर्यंत पाणीसाठा वीस टीएमसी इतकाच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार 2022 च्या पावसाळ्यात धरणात 25.40 ऐवजी 20 टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवला. त्यानंतर लाभ क्षेत्रात पाणी कमतरता भासेल, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी मांडल्यानंतर गतवर्षी पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ करून, तो बावीस टीएमसी केला. यंदाही तेवढाच पाणीसाठा ठेवण्यात आला. सध्या या धरणात 20.23 टीएमसी पाणीसाठा आहे.
धरणाची सद्य:स्थिती
121 गावांमधील 41 हजार हेक्टर क्षेत्रांवरील शेतीला पाणीपुरवठा
धरणाला दोन वर्षांत पाच पट गळती वाढली
धरणाच्या गळतीतून प्रतिसेकंद 277 लिटर पाणी वाया जाते.
पाणी पातळीनुसार टप्प्याटप्प्याने गळती काढण्याचे काम करणार
काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याच्या कामाची वर्कऑर्डर झाली असून तज्ञ समितीच्या बैठकीनंतर जानेवारी महिन्यापासून गतीने काम सुरु केले जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ड्रिलींगचे काम आटोपून घेतले जाणार आहे. काम घेतलेल्या कंपनीने आवश्यक सर्व यंत्रसामग्री धरणस्थळावर आणली आहे. त्यामुळे जानेवारी ते 30 जून या कालावधीत जसजसे पाणी कमी कमी होत जाईल तसतसे काम केले जाणार आहे. यावर्षी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित काम पुढी वर्षी पुन्हा जानेवारीपासून सुरु करून ते पूर्ण केले जाणार आहे.
ए.एस.पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग (बांधकाम कक्ष)








