मुख्यमंत्री-विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव
बेळगाव : सिराचे आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी. बी. जयचंद्र यांना यंदाचा सर्वोत्तम आमदाराचा पुरस्कार देण्यात आला. मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्या हस्ते या ज्येष्ठ आमदारांचा गौरव करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानसभेचे उपसभाध्यक्ष चंद्राप्पा लमाणी आदी उपस्थित होते. भोजन विरामानंतर सभाध्यक्षांनी सर्वोत्तम आमदार पुरस्कारासाठी जयचंद्र यांच्या नावाची घोषणा केली. आमदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. जयचंद्र हे एक उत्तम संसदीयपटू आहेत. विधानसभेच्या कामकाजात जास्तीत जास्त भाग घेतात. सातवेळा ते आमदार झाले आहेत. सध्या कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी म्हणूनही ते काम करीत आहेत. विरोधी पक्षाचे उपनेते, लघुपाटबंधारे मंत्री म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. कृषी व पाटबंधारे योजना राबविण्यात त्यांना विशेष रस आहे, असे सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले.









