मनपा अभियंत्यांकडून तक्रार : मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून किल्ला तलाव आवारातील पदपथावर बसविण्यात आलेल्या पथदिपांचे युजी केबल पोल टर्मिनेशन प्लेट, एमसीबी आणि मीटर केबलची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महानगरपालिकेचे साहाय्यक अभियंता सुनील के. जयराम यांनी सोमवार दि. 16 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, स्मार्ट सिटी योजनेतून किल्ला तलाव आवारात विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. तलावाच्या सुशोभिकरणासह आकर्षक पथदीप बसविण्यात आले आहेत. पदपथावर बसविण्यात आलेले पथदीप मात्र, अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. अधिवेशनानिमित्त बेळगावला आलेल्या सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी किल्ला तलावाला भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली.
त्यानंतर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पथदिपांची देखभाल पाहणारे महानगरपालिकेचे अभियंता सुनील के. जयराम यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दि. 11 रोजी किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तलावाच्या पदपथावर बसविण्यात आलेल्या 51 पथदिपांच्या खांबांचे युजी केबल पोल टर्मिनेशन प्लेट, 42 खांबांचे एमसीबी आणि 126 मीटर केबल असे एकूण 54 हजार 204 ऊपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोमवार दि. 9 रोजी सायंकाळी 6 ते मंगळवार दि. 10 सायंकाळी 7.30 यादरम्यान चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे पथदीप देखभाल करणारे अभियंता सुनील के. जयराम यांनी याप्रकरणी सोमवार दि. 16 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात चोरीची फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर पुढील तपास करीत आहेत.









