भाजपचा आरोप : सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन
बेळगाव : राज्यात गांजा व अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यातील तरुण हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून कर्नाटक हे अमलीपदार्थमुक्त राज्य असावे, या मागणीसाठी मंगळवारी भाजपच्यावतीने सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील गृहखाते हे गांजा व अमलीपदार्थांचे सेवन रोखण्यात अपयशी ठरले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी अमलीपदार्थांची वाहतूक करणारी वाहने पकडली आहेत. त्यामुळे इतकीशी कारवाई योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंत सोयीस्कररीत्या अमलीपदार्थ पोहोचत असल्याने व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे यामध्ये दोषी आढळणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी व पोलिसांनीही कारवाई योग्यरित्या करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुराप्पा यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.









