बेळगाव : 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुविधा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक निवृत्त नोकर कर्मचारी संघटनेतर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
सातव्या वेतन आयोगानुसार मासिक 26,423 रुपये निवृत्ती वेतन मिळत होते. सध्या सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे आर्थिक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करून सातव्या वेतन आयोगानुसार आर्थिक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदारांकडे मागणी पूर्ण करण्यासाठी शिफारस पत्रे दिली आहेत. मात्र आजतागायत याकडे दुर्लक्ष झाले आहे. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुधारीत आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
2022 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वेतनात सुधारणा करावी, यासाठी कर्मचारी मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढत आहेत. याबाबत सरकारलाही जागे करण्यात आले आहे. मात्र अद्याप सरकारकडून सुधारीत आदेश जारी करण्यात आलेला नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सुधारीत नवीन आदेश जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









