हा लढा मंत्रिपदाचा नाही, अस्मितेचा – भुजबळ
नाशिक : प्रतिनिधी
महायुतीने आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा वापर करत अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले. यामुळे घटक पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. यातील काहींनी आपली नाराजी थेट उघड केली. यातीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना डच्चू दिल्याचे समजले. या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी नाशिक येथे आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला.
नागपूरमध्येच छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी थेट नाशिकची वाट धरली. येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती, धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. नगर परिषद, जिल्हा, पंचायत समिती यात आपण आपली ताकद दाखवून देणार आहे, असे त्यांनी म्हटले.
मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे. मी आज कार्यकर्त्यांना मागील पाच-सहा महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडलं त्याचा इतिहास सांगितला. आता मी माझ्या मतदारसंघात जात आहे. माझ्या लोकांशी चर्चा करेन. राज्यभरातील कार्यकर्ते, समर्थक, समता परिषदेतील लोक उद्या मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका ठरवेन. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना सांगितलं आहे की तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो शांतपणे करा. सर्वांच्या मनात निराशा आहे, परंतु मोबाईलवर व्यक्त होताना किंवा कुठेही प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना असंस्कृतपणे बोलू नका, शिवीगाळ करू नका, ‘चप्पल मारो’सारखं आंदोलन करू नका. लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठेही असंस्कृतपणा दाखवू नका. शब्द जपून वापरा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
माझे मंत्रिपद कोणी नाकारले शोधावे लागेल
माध्यम प्रतिनिधींनी तुमचे मंत्रिपद नेमके कोणी नाकारले, असा प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी आग्रही होते. पंरतु पक्षाने मला मंत्रिपद नाकारले. त्यामुळे माझे मंत्रिपद कोणी नाकारले ते शोधावे लागेल. तेच शोधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. परंतु, हा निर्णय पक्षांच्या प्रमुखांचा असतो. म्हणजेच भाजपमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचे, नाही द्यायचे तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेबाबतचे निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्णय अजित पवार घेतात. सर्वांनाच मंत्रिपद हवे असते. परंतु, याठिकाणी प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे माझी अवहेलना करण्यात आली त्या अवहेलनेचा विषय आहे. त्या संदर्भात मी उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलेन.
छगन भुजबळ तसा मनुष्य नाही…
प्रफुल्ल पटेलांना चार महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जायचे म्हटले होते. त्यावेळी माझे ऐकले नाही आणि आता सांगत आहेत. मी काय खेळणं आहे का तुमच्या हातातलं. तुम्हाला वाटेल तेव्हा वर जा खाली बसा, आता निवडणूक लढवा सांगता. मी राजीनामा दिल्यानंतर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल. मी त्यांना सांगितले होते की मला जायचं आहे पण थोडे दिवस द्या. मतदारसंघामध्ये जी कामे आहेत ती पूर्ण करतो. लोकांची समजूत काढू आणि मग जाऊ. तुम्ही उठ आणि बस म्हणणार असाल तर छगन भुजबळ तसा मनुष्य नाही, असेही ते म्हणाले.
शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केलं
शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो. मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी कोणाचाच पत्ता नव्हता, मी आणि शरद पवार आम्ही दोघेच होतो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रिपद दिले, गृहमंत्री बनवले. ‘टाडा’ त्यावेळी जोरात होता, मी गृहमंत्री झालो. दाऊदचे कोणी नाव घेत नव्हते, छगन भुजबळांनी त्याचे नाव गृहमंत्रिपदी असताना घेतले होते. बेळगाव सत्याग्रहाला बाळासाहेब ठाकरे यांनी मला पाठवले होते. कर्नाटकात शिवसेनेचा राग होता. सगळीकडे चेकिंग सुरू होती, मी मुंबईत आलो. दाढी लावली, हाती शबनम घेतली आणि गोव्याला गेलो. मुस्लिम माणसाचा पेहराव करून घेतला. गोव्यात काही कार्यकर्ते भेटले, तेथून मी कर्नाटकमध्ये गेलो. ज्या ज्या वेळी आदेश झाला त्यावेळी मी काम केले, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या कार्याचा आलेख समर्थकांसमोर मांडला.
सगळ्यांच्या चर्चा होतात मग आपल्या का नाही?
लोकसभा निवडणुका लागल्या, अजितदादांनी मला बोलवले. मी लोकसभेचे तिकीट मागितले नव्हते, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. तीन आठवडे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. अजित पवार बोलले भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही. त्यानंतर आमचा उमेदवार पडला. मी राज्यसभेवर जातो, 40 वर्ष झाले असे मी बोललो. मात्र अजितदादांच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे वहिनीला राज्यसभेवर पाठवले. साताराची जागा आम्ही भाजपला सोडली. त्याबदल्यात पियूष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती. मकरंद पाटील यांच्या भावाची जागा मला द्या. मात्र मी शब्द दिला आहे असे मला सांगितले. सगळ्यांच्या चर्चा होतात मग आपल्या का नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
कसला वादा, अन् कसला दादा
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देऊ, त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला.
मी पुन्हा उभा राहीन
हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहीन, लोकशाही आहे. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ते ऐकत नसल्याचे सांगितले. फडणवीस देखील अजित पवारांना बोलले, भुजबळांना मंत्री करा. पण त्यांनी ऐकले नाही. सरकारी पक्षात असल्याने बोलता येत नाही. जे झाले ते लोकांच्या कानावर टाकणे गरजेचे आहे. विविध पक्षातील लोक नाराज झाले, पण दादांचा वादा महत्त्वाचा आहे. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जावू नका, निराश होवू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.









