वृत्तसंस्था/ ओस्लो, नॉर्वे
टीम आशियाने येथे झालेल्या पहिल्या वाल्डनर चषक टेबलटेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आशिया संघात भारताच्या मनिका बात्राचाही समावेश आहे. आशिया संघाने विश्व संघाचा 14-10 अशा फरकाने पराभव करून हे यश मिळविले.
या निमंत्रितांच्या स्पर्धेची सुरुवात स्वीडनचे 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमधील सुवर्णविजेते जॅन-ओव्ह वाल्डनर यांनी केली होती. आशिया संघात सहावेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन मा लाँग, पॅरिस ऑलिम्पिकमधील एकेरीचा चॅम्पियन चीनचा चेन मेंग, दक्षिण कोरियाची दोनदा ऑलिम्पिक कांस्य मिळविणारी शिन युबिन, कझाकचा किरिल गेरासिमेन्को व भारताची मनिका बात्रा यांचा समावेश होता.
वाल्डनर चषक ही दोन दिवसीय पुरुष व महिलांची स्पर्धा असून त्यात एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरीचे सामने घेतले जातात. पहिल्या दिवशी विजय मिळविल्यानंतर एक गुण तर दुसऱ्या दिवशी विजय मिळविणाऱ्यांना दोन गुण दिले जातात. पहिल्या दिवशी मनिका बात्रा व शिन युबिन यांना महिला दुहेरीच्या सामन्यात प्युर्टोरिकोच्या अॅड्रियाना डायझ व रोमानियाची बर्नाडेट स्झॉक्स यांच्याकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या दिवशी मनिका बात्राची एकेरीची लढत अॅड्रियाना डायझशी झाली आणि त्यातही मनिका 0-2 अशी पराभूत झाली.
विश्व संघात स्वीनडचा पॅरिस ऑलिम्पिकमधील एकेरीचा रौप्यविजेता ट्रुल्स मोअरगार्ध व जर्मनीचा सहावेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन दिमित्रिस ओव्हत्चारोव्ह यांचा समावेश असून ब्राझीलचा ह्युगो काल्डेरानो हाही त्यांच्यासमवेत आहे. दुसऱ्या दिवशी विश्व संघाने 10-8 अशी आघाडी घेतली होती. पण आशिया संघाने जोरदार मुसंडी मारत शेवटचे तीन सामने जिंकून 14-10 असा विजय मिळविला. शेवटचा मा लाँगचा सामना निर्णायक ठरला. लाँगने मोअरगार्धला पराभूत करून आशिया संघाचे जेतेपदही निश्चित केले.









