अवैध खाणकामाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे वनमंत्री के. पोनमुडी हे मंगळवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीसमोर हजर राहिले. ईडीने अवैध खाणकामाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वनमंत्र्यांचा जबाब नेंदवून घेतला. यापूर्वी जुलै महिन्यात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वनमंत्री आणि द्रमुक नेत्याचा पुत्र माजी खासदार डॉ. पी. गौतम सिगामणि तसेच अन्य काही कुटुंबीयांची 14 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
2007-10 पर्यंत पोनमुडी हे तामिळनाडू सरकारमध्ये खाणमंत्री होते. याकाळात त्यांनी स्वत:चे पुत्र पी. गौतम सिगामणि, मुलीचा पती के.एस. राजमहेंद्रन आणि जयचंद्रन यांच्या नावावर खाणकामाचे पाच परवाने जारी केले होते. तर सिगामणि यांनी मिळालेल्या भूखंडात खाणकाम करविले केले होते. त्यांनी मर्यादेपेक्षा अधिक खनन केले आणि त्याच्या विक्रीतून झालेली कमाई विदेशात गुंतविले असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यावर राज्य पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच्या विरोधात मंत्र्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
यानंतर हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी निगडित असल्याने ते ईडीकडे वर्ग करण्यात आले. ईडीने तपासाच्या अंतर्गत मागील वर्षी जुलै महिन्यात चेन्नई आणि विल्लुपुरम येथे 74 वर्षीय मंत्री तसेच त्यांच्या पुत्रांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यानंतर 14 कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मंत्री पोनमुडी हे विल्लुपुरम जिल्ह्यातील तिरुक्कोयीलुर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर त्यांचे पुत्र सिगामणि हे कल्लाकुरुचिचे माजी खासदार आहेत.









