बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम रविवार दि. 15 रोजी शेतकऱ्यांनी बंद पाडल्याने ठेकेदाराने दि. 16 रोजी काम बंद ठेवले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपेपर्यंत बायपासचे काम करू नये, असा सल्ला पोलिसांनी दिल्याने ठेकेदाराने सावध भूमिका घेतल्याचे समजते. शहरातून येणारी वाहने बाहेरून महामार्गाकडे वळविण्यासाठी हलगा-मच्छे बायपासचे काम केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे बायपासचे काम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे. रस्ताकाम करताना कोणत्या आधारावर काम केले जात आहे, याबाबत आवश्यक कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पण महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना कागदपत्रे देण्याचे केवळ आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात कागदपत्रे देण्यात येत नसल्याने शेतकरी आक्रमक बनले आहेत.
सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला असल्याचे म्हटल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असताना काम सुरू आहे. त्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत रस्त्याचे काम करू नये, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पण त्यांचा विरोध डावलत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम केले जात असल्याने रविवारी शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत काम बंद पाडले. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळा बायपासचे काम सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ठेकेदाराने काम सुरू केले नाही. सध्या बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त आहे. त्यामुळे बायपासच्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त हटविला आहे. यासाठी अधिवेशन संपेपर्यंत बायपासचे काम करण्यात येऊ नये, असा सल्ला पोलिसांनी दिल्याने ठेकेदाराने सावध भूमिका घेत काम बंद ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.









