पहिले रेल्वेगेट येथील घटना
बेळगाव : रेल्वेची धडक बसल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 16 रोजी सकाळी 9.50 च्या दरम्यान पहिले रेल्वेगेटवर घडली. शशिकांत नेमाणी हुंदरे (वय 80, रा. कडोलकर गल्ली) असे त्यांचे नाव असून जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा ऊग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शशिकांत हे शहरातील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला जातात. नेहमीप्रमाणे ते कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. पहिले रेल्वेगेटवर रेल्वे येत असल्याने गेट पडला होता. तरीदेखील त्यांनी रेल्वेगेट ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आलेल्या मिरज पॅसेंजर रेल्वेने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना बहुदा कमी ऐकू येत असावे त्यामुळेच रेल्वे येण्याचा अंदाज आला नसावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.









