भाजप आमदार अरुण यांची मागणी
बेळगाव : राज्य सरकारने सरकारी सेवेत थेट नेमणूक करताना क्रीडा क्षेत्रातील साधकांना 2 टक्के आरक्षण देण्याच्या नियमाला सरकार खो घालण्याचा प्रयत्न करीत आहे. क्रीडा साधकांना 2 टक्के आरक्षण देऊन प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आमदार व राज्य भाजपचे सचिव डी. एस. अरुण यांनी केली. विधानपरिषदेमध्ये शुन्य प्रहरात अरुण बोलत होते. सरकारी सेवेत थेट नेमणूक करताना सामान्य, अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले आहे. क्रीडा साधकांना 2 टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने मागील 9 सप्टेंबरला आधी सूचना जारी केली होती. कॉमनवेल्थ एशियन गेम्स, ऑलिम्पिक यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धात क्रीडापटू किती गुण मिळवितात यावर सरकार अद्याप विचार करीत आहे. मात्र आता एकमेव निर्णय घेऊन क्रीडा साधकांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सरकारकडून व्हावेत, अशी अपेक्षाही आमदार अरुण यांनी व्यक्त केली.









