अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात नोंदणी
बेळगाव : बहुप्रतीक्षेत असलेल्या रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी मुदत मिळाली आहे. संबंधित रेशन कार्डधारकांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात येऊन रेशनकार्डमधील दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे. मागील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या रेशन कार्ड दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करणे, पत्त्यात बदल आणि इतर कामे केली जाणार आहेत. नवीन प्रणालीनुसार ऑनलाईन पद्धतीने ही फेरफार केली जाणार आहे. रेशनकार्डमधील दुरुस्तीला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री मुनियप्पा यांनी लवकरच रेशनकार्ड प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते. याबाबत शासनाकडून पत्रक काढण्यात आले आहे. मागील कित्येक महिन्यापासून रेशनकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डधारकांना मासिक रेशनपासूनही दूर रहावे लागले होते. मात्र आता रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. नवीन नावाची नोंदणी किंवा नाव कमी करणे ही प्रक्रिया सुरु झाली आहे.









