सेवनाचे समर्थन करणे अयोग्य : सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंमली पदार्थ हे सर्वांसाठीच, विशेषत: युवकांसाठी अत्यंत घातक असून कोणत्याही कारणास्तव त्यांच्या सेवनाचे समर्थन केले जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. नशेत धुंद राहणे याचा अर्थ ‘कूल’ होणे असा होत नाही, अशी टिप्पणी न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अंमली पदार्थांसंबंधातील एक सुनावणी प्रसंगी केली.
अंमली पदार्थांच्या व्यापाराचा आरोप असणाऱ्या अंकूश विपन कपूर नामक आरोपीच्या संदर्भात ही सुनावणी होती. या आरोपीविरोधात चौकशी थांबविता कामा नये. ती पुढे सुरु ठेवावी असा आदेश न्यायालयाने दिला. अंमली पदार्थांच्या सेवनाचे अत्यंत हानीकारण दुष्परिणाम होतात. ते शारिरीक, मानसिक आणि आर्थिकही असतात. त्यांच्या कचाट्यात केवळ दलीत किंवा मागास समाजातील युवकच सापडतात असे नाही. तर कोणत्याही समाजातील युवक सापडू शकतात. त्यामुळे अशा पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावयास हवी. त्यांना कोणत्याही कारणास्तव सूट मिळता कामा नये. अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन लागल्यानंतर अशा युवकांचे तर जीवन उध्वस्त होतेच, पण त्यांच्या कुटुंबाचीही हानी होते. अंमली पदार्थांचे व्यसन लागलेले तरुण वाईट नसतात. त्यांना लागलेले व्यसन वाईट आहे. त्यामुळे अशा युवकांचा विचार सहानुभूतीपूर्वक होण्याची आवश्यकता आहे, अशा अनेक सूचना न्यायालयाने केल्या आहेत









