शंभू सीमेवर आंदोलन सुरूच : 18 रोजी रेलरोकोचा इशारा
वृत्तसंस्था/ पटियाला
शंभू-खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोमवारी हरियाणात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हिस्सार, सोनीपत, चरखी दादरी, सिरसा, फतेहाबाद, कैथल आणि अंबाला येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून निदर्शने केली. तर दुसरीकडे 18 डिसेंबरला रेलरोको आंदोलन करण्याचाही विचार आहे. रेल्वेरोको यशस्वी झाल्यास सरकार नमते घेऊ शकते असे सांगत शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत रेल्वेगाड्या रोखण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारकडून आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सरकारविरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आंदोलन हे सरकारसाठी मोठे आव्हान ठरू शकते. शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी शेतकऱ्यांना ‘18 तारखेला रेलरोको आंदोलन करा’ अशी हाक दिली आहे. संपूर्ण पंजाबमधील 13,000 गावातील लोकांना त्यांनी आंदोलनात उतरण्याची सूचना केली आहे.









