बेळगाव : बेळगावात कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हा झगमगाट लक्षवेधी ठरत आहे. काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात महत्त्वाच्या चौकात, शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरही आकर्षक रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. विविध प्रकारचे रिल्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
तक्रार करूनही सुरू न झालेले पथदीप आता कार्यान्वित
यापूर्वी शहर आणि उपनगरातील पथदीप बंद स्थितीत होते. त्यामुळे लोकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही सुरू न झालेले पथदीप आता अधिवेशन आणि काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू झाले आहेत. रात्रीच्या वेळी शहरात फेरफटका मारल्यानंतर आकर्षक रोषणाई पाहून डोळे दिपून जात आहेत. गुरुवार दि. 26 व शुक्रवार दि. 27 डिसेंबर रोजी दोन दिवस काँग्रेसचे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाची जोरदार तयारी केली जात आहे.
शहरातील चौक, स्तंभ विद्युत रोषणाईने उजळणार
1924 मध्ये बेळगावात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकारतर्फे बेळगाव शहरात ‘गांधी भारत-100’ कार्यक्रम 26 ते 28 डिसेंबरपर्यंत होणार आहे. हेस्कॉमतर्फे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. 26, 27 व 28 असे तीन दिवस शहरातील प्रमुख 90 चौक (105 किलोमीटरचा रस्ता), सुमारे 300 वृक्ष तसेच 55 विविध स्तंभांना विद्युत रोषणाई करणार असून, याबाबत स्थानिक प्रशासनाबरोबर हेस्कॉमने चर्चा केली आहे. जनतेने नोंद घ्यावी, असे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे.









