वर्षभरापूर्वी वडील गमावल्याने घेतली शैक्षणिक जबाबदारी
बेळगाव : एक वर्षापूर्वी आपले वडील गमावलेल्या एका हुशार विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय साहाय्यक मलगौडा पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांनी या विद्यार्थिनीला दत्तक घेतले आहे. अगसगे येथील आंबेडकर गल्लीचे रहिवासी आनंद नरसू कोलकार यांचे एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या तीन अपत्यांपैकी सिमरन ही हुशार विद्यार्थिनी आहे. वडिलांच्या निधनाने तिचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून मलगौडा पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष अमृत मुद्द्याण्णावर, सदस्य अप्पयगौडा पाटील, पीकेपीएस सदस्य परशुराम रेडेकर, निंगाप्पा कोलकार, अप्पय्या कोलकार, संतोष मेत्री, रंजना कोलकार, मनसव्वा कोलकार आदी उपस्थित होते.









