सूत्रसंचालकाकडून बलात्कारी असा उल्लेख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेसिडेन्सी लायब्रेरीला एबीसी न्यूज ही वृत्तवाहिनी 15 दशलक्ष डॉलर्स देणार आहे. ट्रम्प यांनी एबीसी न्यूजच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. ट्रम्प यांना लेखिका ई. जीन कॅरोलवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याचा दावा एबीसी न्यूजवरील सूत्रसंचालक जॉर्ज स्टेफानोपोलोस यांनी 10 मार्च रोजी स्वत:चा शो ‘थिस वीक’मध्ये केला होता.
याप्रकरणी शनिवारी संबंधित दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले. यानुसार एबीसी न्यूज स्वत:च्या वेबसाइटवर एक पोस्ट करत माफी करणार आहे. तसेच स्वत:च्या दाव्यासाठी खेद व्यक्त करणार आहे. याचबरोबर ट्रम्प यांच्या वकिलाला 1 दशलक्ष डॉलर्सचे शुल्क देणार आहे. एबीसी न्यूजने तडजोडीच्या बदल्यात खटला निकाली काढण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना 2023 मध्ये नूयॉर्क मॅगजीनच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. ट्रम्प यांनी 1996 मध्ये लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता. परंतु न्यायालयाने ट्रम्प यांना केवळ लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरविले होते. याकरता ट्रम्प यांच्यावर 5 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.









