गैरकारभार चव्हाट्यावर : करवसुलीत कसूर केल्याप्रकरणी महसूल उपायुक्तासह पाच
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ख्याती असलेल्या बेळगाव महापालिकेत कोट्यावधी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे करवसुलीत कसूर केल्याप्रकरणी आणि लोकांना असहकार्य केल्याप्रकरणी महसूल उपायुक्तासह पाच जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. बेळगावात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशन काळातच बाहेर पडलेल्या या घोटाळ्यामुळे मनपातील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महापालिकेकडे सध्या सुमारे 1.55 लाखाची मालमत्ता असून, त्यांच्याकडून वार्षिक सरासरी 120 ते 130 कोटी रुपये महसूल आला पाहिजे. मात्र, कर्तव्यात हलगर्जीपणा आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या गैरवर्तनामुळे महापालिकेला वर्षाकाठी 15 ते 20 कोटींचा तोटा होत आहे. तसेच वर्षाला 70 ते 80 कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट असले तरी केवळ 45 ते 52 कोटी इतकाच करवसूल होत आहे. सरासरी 10 ते 15 कोटी रुपयांचा कर अधिकृतपणे प्रलंबित आहे. ही थकबाकी कराची रक्कम महापालिकेकडे जमा होत नाही. करदाते आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये समेट घडत असल्याने मनपाचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
चलन न देताच पैसे वसूल केल्याचे उघड
शहरात 2010 पासून व्यावसायिक आस्थापने, बहुमजली इमारती मिळकतधारकाकडून मनपाला कर भरणे बाकी आहे. कर भरण्यासाठी मालक पुढे आले तरी मनपा अधिकाऱ्यांकडून त्यांना उद्या या, परवा या असे सांगून माघारी पाठवले जात असल्याचा आरोप आहे. तर चलन न देताच पैसेही वसूल केले जात असल्याचे आता समोर आले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कर भरण्यासाठी पाच टक्के सवलतीच्या नावाखाली करचोरी केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. इतकेच नव्हे तर मनपाच्या मालमत्ताही काही खासगी व्यक्तींच्या नावे हस्तांतरीत करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
वर्ष उद्दिष्ट साध्य (कोटींमध्ये)
2020-21 45 37
2021-22 50 45
2022-23 55 41
2023-24 62 57
2024-25 72 55









