भारतात अलिकडच्या काळात पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पुष्कळसे महामार्ग, लघु मार्ग यांची निर्मिती करण्यात आली असून हे मार्ग चकचकीत आणि गुळगुळीत असतात. त्यांच्यावरुन वाहन चालविताना आनंद वाटतो. तथापि, काही रस्ते अत्यंत खराब असतात. अशाच एका मार्गाची ही माहिती आहे. हा मार्ग जगातील सर्वात विचित्र मार्ग म्हणून ओळखला जातो.
हा मार्ग बोलिव्हिया या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या एल्टो नामक भागात आहे. त्याचे छायचित्र पाहूनच अनेकांना धडकी भरते. हा गर्दीचा मार्ग असूनही अरुंद आहे. या मार्गाला अगदी खेटून दाटीवाटीने अनेक घरे बांधली गेली आहेत. तसेच या घरांच्या मागे अगदी त्यांना लागूनच 200 फूट खोलीची मोठी दरी आहे. या दरीमुळे हा मार्ग खरेतर प्रसिद्ध झाला आहे. हा मार्ग ज्या भूमीवर आहे, ती ठिसूळ असून सातत्याने तिची धस होत राहते. त्यामुळे ही दरीही अधिकाधिक रुंद होत चालली आहे. तरीही या घरांमध्ये राहणारे लोक तेथेच रहात आहेत. सर्वाधिक अडचण लहान मुलांची होत आहे. लहान मुळे खेळताना दरीत पडण्याची शक्यता आहे. हा मार्ग बंद करा आणि त्याला लागून असलेल्या घरांमधील लोकांची अन्यत्र व्यवस्था करा, अशी मागणी अनेकदा या देशाच्या प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तथापि, लोक घरे सोडण्यास तयार नाहीत. मुंबई किंवा अन्य महानगरांमध्ये ज्याप्रमाणे पडायला आलेल्या इमारतींमध्येही नागरीक जीव मुठीत धरुन रहात असतात, तशीच काहीशी स्थिती या मार्गावरील घरांची आहे. त्यामुळे हा मार्ग जगातील सर्वात अडचणीचा आणि भीतीदायक मानला जात आहे. गेला 50 वर्षांहून अधिक काळ तो त्याच स्थितीत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.









