काँग्रेस आमदारांचा गदारोळ : ‘नाटक कंपनी’ असल्याचा आर. अशोक यांचा घणाघात
बेळगाव : राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुनिरत्न यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आहे. त्यांच्यावर अत्याचाराची प्रकरणे दाखल आहेत. या दलितविरोधी आमदाराच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चेला अनुमती द्यावी, यासाठी सत्ताधारी आमदारांनीच गदारोळ केला. यावेळी गदारोळ वाढताच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सभात्याग केला. शुक्रवारी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी भाजपने दिलेल्या वक्फच्या मुद्द्यावर दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेला परवानगी मागितली. यावेळी सभाध्यक्षांनी हा विषय आपण नियम 69 अन्वये चर्चेला घेणार आहोत. त्यामुळे चर्चेला सुरुवात करा, अशी सूचना केली. आर. अशोक हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी काँग्रेस आमदारांचा गदारोळ वाढला.
पी. एम. नरेंद्रस्वामी, के. एम. शिवलिंगेगौडा, बी. शिवण्णा, अब्बय्या प्रसाद, नयना मोटम्मा आदींनी आमचा विषय गंभीर आहे, जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आमदार मुनिरत्न यांच्यावर एफआयआर दाखल झाले आहेत. राजकारणातील काही ज्येष्ठ नेत्यांना एचआयव्हीची लागण होईल, याची व्यवस्था करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी केली. सत्ताधारी आमदारांचा गदारोळ वाढताच विरोधी पक्षनेते आर. अशोक हे सत्ताधाऱ्यांवर भडकले. सत्ताधारी आमदारच गदारोळ माजवत असतील तर कामकाज कसे चालणार? असा प्रश्न उपस्थित करीत ही एक नाटक कंपनी आहे. खुळ्यांचा बाजार आहे. मुळात हे सरकारच नालायक आहे. गदारोळ माजवणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करीत भाजपने सभात्याग केला.
याचवेळी महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीची सभागृहात माहिती दिली. त्यांनी ही माहिती देताना भाजपचे कोणीच सदस्य सभागृहात नव्हते. खरेतर राज्यातील हा गंभीर विषय आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात यावे, असे आवाहन महसूलमंत्र्यांनी केले. महसूलमंत्र्यांचे निवेदन संपल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. त्यावेळी सभात्याग केलेले विरोधी आमदार सभागृहात दाखल झाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चर्चेत हस्तक्षेप करीत महसूलमंत्र्यांच्या निवेदनावर अनेक आमदारांना बोलायचे आहे, त्यांचे बोलणे झाल्यानंतर हवे तर विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पुन्हा भडकले. वक्फचा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे आपण विषय मांडणारच, असे आर. अशोक यांनी सांगताच तुम्ही म्हणाल ते ऐकता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. त्यावेळी भाजप-काँग्रेसच्या आमदारांमध्ये वादावादी झाली. गदारोळ वाढताच दुपारी 12.55 वाजता सभाध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
एस. टी. सोमशेखर यांच्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
भाजपच्या आमदारांनी सभात्याग केल्यानंतरही भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बार हे आमदार सभागृहात बसून होते. एस. टी. सोमशेखर यांनी तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 1.20 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी वक्फच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची सभाध्यक्षांनी संधी दिली.









