गुन्हा सिद्ध करता न आल्याने दहा जणांची मुक्तता
बेळगाव : काळ्यादिनाच्या मूक सायकल फेरीत शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवत म. ए. समितीच्या नेते व कार्यकर्त्यांसह दहा जणांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी तिसरे जेएमएफसी न्यायालयात सुरू होती. मात्र, सरकारतर्फे गुन्हा सिद्ध करता न आल्याने दहा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, महेश उर्फ पिंटू परशराम पाटील, सन्मुख शंकर चोपडे, रामचंद्र भाऊराव पाटील, राहुल जयवंत कुरणी, गजानन अनंत कोटे, राघवेंद्र प्रकाश येळ्ळूरकर, लोकनाथ जयसिंग रजपूत, श्रीनिवास कृष्णा पोळ अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
1 नोव्हेंबर 2016 रोजी काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरीला जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटी लादल्या होत्या. मात्र, सायकल फेरीदरम्यान शहापूर परिसरात दगडफेक करण्यासह पताका काढणे, संभाजी उद्यानात बंदूकधारी घोडेस्वार दाखल करणे, एकूणच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत शांतता भंग करण्याचा ठपका ठेवत वरील दहा जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालिन पोलीस निरीक्षक डी. सी. लक्कन्नावर यांनी दोषारोप दाखल केल्याने तिसरे जेएमएफसी न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र सरकारतर्फे वरील दहा जणांवर आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. रिचमॅन रिकी यांनी काम पाहिले.









