स्त्री जातीच्या अर्भकाचा मृत्यू : पोलिसात गुन्हा दाखल
बेळगाव : प्रसूतीनंतर स्त्रि जातीच्या नवजात अर्भकाला जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात सोडून देऊन मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात बीबीजान सद्दामहुसेन सय्यद, रा. बैलहोंगल या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वरील महिलेचा शोध चालविला असून तिने दिलेला पत्ता अर्धवट असल्याने तिचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. रविवार दि. 8 डिसेंबर रोजी एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात दाखल झाली. आपत्कालीन रुग्ण म्हणून तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यात आले. त्यावेळी तिने आपले नाव बीबीजान सद्दामहुसेन सय्यद, रा. बैलहोंगल असे सांगितले. त्यानुसार तशी नोंद करून घेण्यात आली.
तिने रविवार दि. 8 रोजी रात्री 9.49 च्या दरम्यान स्त्राr जातीच्या अर्भकाला जन्म दिला. पण अर्भकाची कोणत्याही प्रकारे काळजी न घेता, तसेच डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता ती मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी 7.30 वाजता रुग्णालयातून निघून गेली. त्यानंतर त्याचदिवशी रात्री 10.30 वा. अर्भकाचा मृत्यू झाला. त्यामुळे ही माहिती बुधवारी सकाळी 10.30 वा. एपीएमसी पोलिसांना देण्यात आली. लागलीच पोलीस निरीक्षक यू. एस. आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल केंपण्णा खानापुरी यांनी फिर्याद दिल्याने वरील महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविण्यात आला आहे. प्रसूती विभागात दाखल होताना त्या महिलेने बैलहोंगल येथील आपला पत्ता दिला होता. मात्र सदर पत्ता अपूर्ण असल्याने तिचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात आहे. पोलीस निरीक्षक यू. एस. आवटी अधिक तपास करीत आहेत.









