नागरिकांची पाण्यासाठी भटकंती : पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
ओलमणी येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या वर्षभरापासून विस्कळीत झाली असून, अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांची गैसोय होत आहे. गावातील नळपाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. ओलमणी गावची लोकसंख्या सुमारे 3000 च्या घरात आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी या गावासाठी जलनिर्मल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जलवाहिन्यांद्वारे मलप्रभा नदीतून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. नदीच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणीसाठा बारमाही उपलब्ध असतो. मात्र गावाला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्dयात गावाला सुरळीत पाणीपुरवठा होतो. परंतु पावसाळ्dयात गावासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे गढूळ पाण्याची सबब पुढे करून किमान चार महिने या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित केला जातो. मात्र गणेशचतुर्थीनंतर गावासाठी सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु गेल्या वर्षभरापासून ओलमणी गावचा नळ पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
वर्षभराच्या पाणीपट्टी वसुलीमुळे नागरिकांत नाराजी
यासंदर्भात जांबोटी ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता अनियमित वीजपुरवठा, विद्युत मोटारीत होणारा बिघाड, जलवाहिन्या फुटणे, अपुरा कर्मचारी वर्ग आदी कारणे सांगितली जातात. गावाला सहा महिनेही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. मात्र नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी वसूल करण्यात येत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी जांबोटी ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ओलमणी येथील विस्कळीत झालेला नळ पाणीपुरवठा सुरळीत करावा व नियमित पाणीपुरवठा करून नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी होत आहे.
आठवड्यातून फक्त दोन वेळा पाणीपुरवठा
गेल्यावर्षी जलजीवन योजना राबविण्यात आल्यामुळे ओलमणी गावच्या नळपाणी योजनेत तांत्रिक बिघाड झाला असून गावातील काही भागात मुबलक पाणी तर काही भागात अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच पूर्वी दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यातून केवळ एक-दोन दिवस सुरू आहे. कधी कधी आठवडाभर गावात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.









