शहरासह उपनगरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य : आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
बेळगाव : स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देत विविध योजना अंतर्गत सरकारकडून कोट्यावधी ऊपये खर्च केले जातात. मात्र स्मार्ट सिटीत स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी सात ई-स्वच्छतागृह सुरू करण्यात आली होती. प्रामुख्याने शहरातील मध्यवर्ती भागात स्वच्छतागृहांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने शैक्षणिक, उद्योग व इतर कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना स्वच्छतागृहाअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.शहरातील खडेबाजार, मध्यवर्ती बसस्थानक, समादेवी मंदिर दरम्यानच्या अंतरावर एकही स्वच्छतागृह नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांची वर्दळ मोठी असते.
पण स्वच्छतागृहच नसल्याने खासगी हॉटेल्स किंवा अन्य ठिकाणी लोकांना जावे लागत आहे. स्मार्ट सिटीत स्वच्छ आणि सुंदर बेळगाव हे केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतागृहाअभावी शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील संगोळळी रायण्णा चौकातील रस्त्यानजीक लोक मूत्रविसर्जन करत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. इतकेच नव्हे तर महिलांसाठीही स्वच्छतागृह नसल्याने महिलावर्गाची गैरसोय होत आहे. शहरातील खडेबाजारपासून समादेवी मंदिर, अशोक सर्कलपासून चन्नम्मा सर्कल आणि कोल्हापूर सर्कलपासून केएलई ऊग्णालयापर्यंत सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राणी चन्नम्मा सर्कलनजीक एकही स्वच्छतागृह नाही
जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय त्याचबरोबर विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. संगोळळी रायण्णा सर्कलपासून राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाभावी महिलांची मोठी गैरसोय होत आहे.









